कोल्हापूर - कथा, कादंबरी, नाटक अशा विविध साहित्य प्रकारातून वाचकाला इतिहासाकडे वळविण्याचे काम महाराष्ट्रातील साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणावर केले, असे प्रतिपादन राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित डॉ. प्रमिला जरग लिखित "आदिपर्व' कादंबरीच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक भगवंतराव मोरे होते.
दरम्यान, डॉ. जरग यांनी इतिहासातील एक उपेक्षित कर्तबगार व्यक्तिमत्त्व कादंबरीच्या माध्यमातून सर्वांसमोर आणले आहे. इतिहासातील अशा अनेक दुर्लक्षित, उपेक्षित व्यक्तिमत्त्वांना साहित्यातून पुढे आणले पाहिजे. असे लेखन प्रकाशित करण्यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुढाकार घेईल, अशी घोषणाही श्री. कर्णिक यांनी केली. डॉ. जरग यांची ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजी महाराजांचे वडील मालोजीराजे भोसले यांच्या जीवनावर आणि मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्लक्षित कालखंडावर प्रकाश टाकणारी मराठीतील पहिलीच कादंबरी आहे. प्रकाशन क्षेत्रातील प्रसिद्ध मेहता पब्लिशिंग हाऊस संस्थेतर्फे कादंबरी प्रकाशित केली आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ""ऐतिहासिक साहित्यकृतीच्या वाटा इतिहासातून जातात. इतिहास संशोधकांपेक्षाही इतिहासाची खरी कीर्ती साहित्यिकांनी लोकांसमोर मांडली आहे. त्यामुळेच इतिहासाशी समाजाला जोडताना साहित्यिकांची जबाबदारी मोठी असून, इतिहासातील सत्याशी त्यांनी प्रामाणिक असले पाहिजे.''
प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, ""इतिहासाशी प्रामाणिक राहून केलेले आणि नैतिकतेचा सांभाळलेला तोल ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत. मराठ्यांच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण कालखंडाचा संदर्भ ग्रंथ म्हणून ही कादंबरी निश्चितच उपयुक्त आहे.''
लेखिका डॉ. जरग म्हणाल्या, ""आई कमलाबाई मोरे यांना जिजाऊंवर लेखन करायचे होते. त्यासाठी त्यांनी चौफेर अभ्यास सुरू केला होता; मात्र त्यांचे हे काम अपूर्ण राहिले. ते पूर्ण करण्यासाठी माझा अभ्यास सुरू झाला आणि या अभ्यासात मालोजीराजे यांच्यावर कादंबरी लिहावी, असा विचार पुढे आला.''
कार्यक्रमात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुरस्कार मिळाल्याबद्दल धम्मपाल रत्नाकर, सुचिता पडळकर यांचा सत्कार झाला. मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक अनिल मेहता, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांची भाषणे झाली. भीमराव धुळुबुळू यांनी सूत्रसंचालन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment