Thursday, October 28, 2010

Shahajiraje With Jijau And Shivaji Maharaj



Swarajya Sankalpak Shahajiraje Malojiraje Bhosale.....

भातोडीच्या लढाईची आठवण जपायला हवी..



शहाजीराजांचा आज स्मृतिदिन

नगर, २3 जानेवारी

भातोडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशाही फौजांची धूळधाण उडवणारे ‘स्वराज्य संकल्पक’ शहाजीराजे यांचे भव्य स्मारक उभारण्याचं काम वेरूळला सुरू आहे. नगरमध्ये मात्र एका अर्धपुतळ्याव्यतिरिक्त या महान राजाची आठवण जागवणारं काहीही स्मारक नाही.
निजामशाहीच्या सरत्या काळात अनेक मराठे सरदारांचा उदय झाला. त्यांच्या पराक्रमाने अवघा महाराष्ट्र झळाळून निघाला. शहाजीराजांची समशेर सन १६२४ मध्ये नगरपासून १८ किलोमीटर अंतरावर झालेल्या भातोडीच्या लढाईत तळपली. मुघलसम्राट जहांगीराचा सेनापती लष्करखानाचे १ लाख २० हजार आणि विजापूरच्या आदिलशाहाचे ८० हजार अशा एकूण २ लाखाच्या फौजेला त्यांनी केवळ रोखलेच नाही, तर पळता भुई थोडी केली. शहाजीराजांच्या या पराक्रमाची आठवण करून देणारे भव्य स्मारक नगरमध्ये उभारावे, अशी मागणी अनेक ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी १९७८ मध्ये केली होती. त्यानुसार तेव्हाचे महसूलमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत राजे शहाजी प्रतिष्ठानची स्थापना नगरमध्ये करण्यात आली. शहाजीराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा आणि त्यांचे चरित्र प्रकाशित करण्याचा संकल्प त्या वेळी करण्यात आला. भातोडीच्या लढाईचे स्मारक, तसेच समाधीचा जीर्णोद्धार करण्याचेही ठरले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९७९ मध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या आवारात शहाजीराजे व राजमाता जिजाऊंचा अर्धपुतळा बसवण्यात आला. व्याख्यानमाला घेऊन स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं, पण भातोडीच्या स्मारकाचं स्वप्न मात्र साकार होऊ शकलं नाही.
ज्या भातोडीत मेहेकरी नदीकाठी शहाजीराजे व त्यांचे धाकटे बंधू शरिफजी यांनी मोठा पराक्रम गाजवला तेथील महाल आता शेवटच्या घटका मोजत आहेत. गनिमी कावा वापरून शहाजीराजांनी भातोडीच्या तुडुंब भरलेल्या तलावाचा भराव सुरूंग लावून फोडला. पाण्याच्या लोंढय़ात शत्रूचं लाखावर सैन्य वाहून गेलं. उरल्या-सुरल्या सैन्याला पळती भुई थोडी झाली. दोन सुलतानी महासत्तांचा कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी सैन्यानिशी पराभव करणारी ही लढाई त्रिखंडात गाजली. शहाजीराजांच्या ठायी असलेली धडाडी, बुद्धिमत्ता आणि युद्धकौशल्याचा प्रत्यय यानिमित्ताने सर्वाना आला. याच लढाईतील व्यूहनितीचा उपयोग पुढे शिवाजीराजांना अनेक लढाया जिंकण्यासाठी झाला.
भातोडीत लष्कराचे मोठे केंद्र होते. जिथे हत्ती, घोडय़ांना आणि सैनिकांना प्रशिक्षण दिले जात असे, तो परिसर आता पार उजाड झाला आहे. कलावंतीणीचा महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंतील सागवानी खांब, तुळया, दगड लांबवले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या भिंती ढासळत आहेत. हा परिसर नगर आणि बीड जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवर येत असल्याने त्याची देखभाल कोणी करायची हा प्रश्न आहे. निदान एखादा स्मृतिफलक तिथे उभारला, तर या स्थानाचं महत्व लक्षात येऊन त्याची जपवणूक होऊ शकेल.
नगर शहरात सध्या नगर अर्बन बँकेचे मुख्य कार्यालय आहे, त्याच्या शेजारी भोसले घराण्यानं बांधलेलं अमृतेश्वराचं मंदिर आहे. पूर्वी याच परिसरात त्यांचा सरकारवाडा आणि घोडय़ाची पागा होती. शहाजीराजांनी निजामशाहच्या वारसाला मांडीवर बसवून काही वर्षे राज्यकारभारही पाहिला. काही काळ त्यांचं वास्तव्य नगरच्या भुईकोट किल्ल्यातील राजमहालात होतं. वडिलांच्या विरोधात बंड करून नगरला आलेला युवराज शहाजहान शहाजीराजांच्या
आश्रयाला आला तेव्हा त्यांची भेट इथेच झाली होती.
शहाजीराजांचं मूळ गाव असलेल्या वेरूळ येथील गढीच्या परिसरात मालोजी व शहाजीराजांचं भव्य स्मारक उभारलं जात आहे. शहाजीराजांचा देखणा पुतळा तिथे उभारण्यात आला आहे. असंच स्मारक नगर आणि भातोडीला उभं राहायला हवं. तसा संकल्प त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या (२३ जानेवारी) पुन्हा करायला हवा..